जेव्हा शासनाच्या मालकीचा व इमारतसाठी असलेल्या भोगवट्याखालील बिनदुमाला जागेला संलग्न असलेल्या एखाद्या लहान चिंचोळ्या जमिनीचा पट्टा वाजवी रीतीने निकालात काढता येणार नाही, तेव्हा जिल्हाधिकारी इमारतीसाठी असलेल्या संलग्न जागेच्या धारकाला तो स्वत:ची जागा ज्या धारणाधिकार पद्धतीव धारण करीत असेल त्या धारणाधिकार पद्धतीवर हा जमिनीचा पट्टा प्रदान करू शकेल, मात्र ज्या दराने तो सध्या आकारणी देतो किंवा त्याच्या जागेचे भाडे देतो त्या दराने त्या पट्ट्याच्या जमिनीसाठी आकारणी किंवा भाडे देण्यास तसेच, जिल्हाधिकारी निश्चित करील त्याप्रमाणे किंमत किंवा अधिमूल्य देण्यास कबूल असला पाहिजे.
इमारत बांधण्याकरिता जमीन प्रदान करण्यात येते, तेव्हा खाली दिलेल्या शर्ती जोडण्यात याव्यात :-
१. प्रतिग्रहीत्याने, ज्या विशिष्ट अकृषिक प्रयोजनार्थ जमीन प्रदान करण्यात आली आहे अशा प्रयोजनार्थ सोयीस्कर होईल इतपत जमीन समतल व स्वच्छ करावी,
२. प्रतिग्रहीत्याने, अधिनियमाच्या व त्याखालील तयार केलेल्या नियमांच्या उपबंधान्वये जिल्हाधिका-याची परवानगी घेतल्याशिवाय ज्या प्रयोजनार्थ जमीन प्रदान केलेली आहे त्या प्रयोजनाव्यतिरिक्त इतर कोणत्याही प्रयोजनार्थ जमिनीचा व त्या जमिनीवर बांधावयाच्या इमारतीचा उपयोग करू नये.
३. प्रतिग्रहीत्याने, जमीन प्रदान कण्यात आल्याच्या तारखेपासून 3 वर्षांच्या आत किंवा जिल्हाधिकारी परवानगी देतील अशा पुढील कालावधीच्या आत जमिनीवर भक्कम व कायम स्वरूपाची इमारत बांधावी, असे न केल्यास, प्रतिग्रहीत्याने दिलेल्या भोगवट्याच्या किंमतीपेक्षा अधिक नसेल एवढी भरपाईची रक्कम देउन ती जमीन पुन्हा परत घेण्यास योग्य ठरेल,
४. नकाशांना मान्यता देण्यास व शर्ती विहित करण्यास सक्षम असलेल्या स्थानिक प्राधिका-याने मान्यता दिलेल्या नकाशानुसार व विहित केलेल्या शर्तीनुसार प्रतिग्रहीत्याने इमारत बांधावी,
५. सर्वसाधारणपणे, भूखंडाच्या एकूण क्षेत्रापैकी २/३ क्षेत्र मोकळे सोडावे आणि जिल्हाधिका-याच्या मते ती जमीन अतिशय मूल्यवान असल्यास किंवा इमारतींमध्ये गरीब वर्गाकडून वस्ती केली जाण्याचा तसेच त्या इमारती बाजाराच्या ठिकाणी व जेथे अगोदरच इमारतींची दाटी झालेली आहे अशा शहराच्या मध्यवर्ती भागात बांधल्या जाण्याचा संभव असल्यास फक्त १/२ क्षेत्र मोकळे सोडावे. एखादी जमीन अधिक मूल्यवान आहे किंवा काय, एखाद्या इमारतीत गरीब वर्गातील लोकांची वस्ती आहे किंवा काय, अथवा त्या व्यक्ती गरीब या वर्गात मोडतात किंवा कसे अथवा एखाद्या क्षेत्रात अगोदरच इमारतींची दाटी आहे किंवा कसे या बाबतीतील जिल्हाधिका-यांचा निर्णय हा अंतिम निर्णय राहील,
(गरीब वर्गातील व्यक्ती म्हणजे, राज्य शासन वेळोवेळी निश्चित करील अशा रकमेपेक्षा ज्यांचे वार्षिक उत्पन्न अधिक होणार नाही अशा व्यक्ती)
६. हे प्रदान अधिनियम व त्याखाली केलेले नियम यांच्या उपबंधांना अधीन राहील,
७. प्रतिग्रहीत्याने अ-नागरी क्षेत्रातील जमिनीतील लोकवस्ती व तिचे स्थान (लोकेशन) लक्षात घेउन जिल्हाधिकारी वेळोवेळी विहित करील इतके अंतर अ-नागरी क्षेत्रातील रस्त्यांपासून सोडून नंतर इमारत बांधावी,
८. जिल्हाधिकारी, राज्य शासनाच्या आदेशांन्वये घालून अशा इतर अटी. करारनामा करण्यासाठी लागणारे नमुने नियमाखाली विहित करण्यात आले आहेत.