महसुली पुस्तक परिपत्रक क्रमांक 27
विषय – तपासणी, शोध, भूमी अभिलेखांच्या प्रती पुरविणे
एक – अधिनियमाचे उपबंध70
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 327 अन्वये सर्व नकाशे आणि भूमी अभिलेख यांची तपासणी करून त्यांच्या प्रती प्रमाणित करून घेण्यासंबंधीचा अधिकार जनतेला प्रदान करण्यात आला आहे. तथापि, हा अधिकार फी भरणे, तसेच या विषयावर तयार केलेल्या नियमान्वये लागू करण्यात आलेल्या निर्बंध यांना अधीन आहे.
2. अधिनियमाचे कलम 2 चा खंड (18) अन्वये ‘भूमी अभिलेख’ या संज्ञेची व्याख्या करण्यात आली असून अधिनियमाच्या उपबंधांन्वये किंवा अधिनियमाच्या प्रयोजनार्थ ठेवण्यात आलेले अभिलेख असा त्याचा अर्थ आहे. ‘जमीन भूमीलेख’ या संज्ञेमध्ये, अंमलात असलेल्या एखाद्या कायद्यान्वये एखाद्या क्षेत्रात अंमलात व अशा कायद्यान्वये किंवा अन्यथा महसूल किंवा भूमापन अधिकाऱ्याकडे अग्रेषित केलेली अंतिम नगररचना योजना, सुधारणा योजना किंवा धारण जमिनींच्या एकत्रिकरणाबाबतची योजना यांच्या नकाशांच्या व आराखड्यांच्या प्रतींचाही समावेश होतो.
3. अधिनियमाच्या कलम 156 मध्ये असे उपबंधित करण्यात आले आहे की, अधिकार अभिलेखाशी संबंधित असलेल्या प्रकरण 10 च्या उपबंधाखाली तयार केलेले नकाशे, नोंदवह्या व अधिकार यांच्याबरोबरच नियमांन्वये विहित करण्यात येईल त्याप्रमाणे प्रत्येक गावाकरिता इतर भूमि अभिलेख तयार करण्यात यावेत. महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाखाली येणाऱ्या निरनिराळ्या विषयाखाली तयार केलेल्या नियमात, आवश्यक तेथे, विवक्षित नकाशे, नोंदवह्या इत्यादी तयार करून त्या ठेवण्याबाबत उपबंध तयार करण्यात आले आहेत. हे सर्व अभिलेख भूमि अभिलेख म्हणून समजण्यात यावेत.
4. अधिनियमाचे कलम 75 हे दुमाला धारणाजमिनींच्या नोंदवहीबाबतचे आहे. इतर गोष्टींबरोबरच, या कलमामध्ये एखाद्या दुमाला जमिनीच्या संबंधात दिलेली सनद कायमची हरवल्यास किंवा नष्ट झाली असल्यास नियमान्वये विहित केलेली फी भरल्यास दुमाला जमिनीच्या नोंदवहीतून संबंधित प्रमाणित गोषवारा देण्यासंबंधीही उपबंधित करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, ज्या प्रकरणात रीतसर किंवा संक्षिप्त संक्षिप्त चौकशी करण्यात आली असेल अशा प्रकरणात त्यांच्या अधिप्रमाणित प्रती, निर्णयांचा अनुवाद, आदेश व अशा चौकशा करण्यासंबंधीची कारणे, तसेच निशाण्या यांच्या प्रतीपक्षकारांनी अर्ज केला असता तसेच, नियमांन्वये विहित केलेला नकाशा काढणे, शोध किंवा तपासणी याबाबतचा आकार भरला असता देता येतात, असेही अधिनियमाचे कलम 239 मध्ये उपबंधित करण्यात आले आहे. भूमी अभिलेख, तपासणी व शोध यासंबंधीच्या प्रमाणित प्रती पुरविण्याकरिता आकारावयाच्या फीची रक्कम महाराष्ट्र जमीन महसूल (तपासणी, शोध व भूमी अभिलेखांच्या प्रती पुरविणे) नियम, 1970 या नावाने संबोधल्या जाणाऱ्या नियमांन्वये विहित करण्यात आली आहे. या नियमांतील उपबंधांचे खालील परिच्छेदात स्पष्टीकरण करण्यात आले आहे :-
दोन – महाराष्ट्र जमीन महसूल (तपासणी, शोध व भूमि अभिलेखाच्या प्रती पुरविणे) नियम, 1970 असे संबोधलेल्या नियमांच्या तरतुदी
5. भूमी अभिलेखांमध्ये समाविष्ट असलेले दस्तऐवज, आराखडे, नकाशे, नोंदवह्या, लेखे व अभिलेख हे त्यांचा प्रभार ज्या अधिकाऱ्याकडे असेल त्या अधिकाऱ्यांच्या परवानगीने तसेच, विहित फी दिली असता, रविवार व सार्वजनिक सुट्या सोडून दररोज नेहमीच्या कार्यालयीन वेळेमध्ये तपासणीसाठी खुले रहावेत. एखादा भूमि अभिलेख तपासू इच्छिणाऱ्या व्यक्तीने अभिलेखांच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे अशा तपासणीसाठी अर्ज करावयाचा असून, त्यामध्ये अभिलेखाचा तपशील आणि तपासणी करण्यामागील प्रयोजन यांचा उल्लेख करावयाचा असतो. असा अर्ज आल्यावर, प्रभारी अधिकाऱ्याने, तपासणीसाठी मागितलेले अभिलेख गोपनीय स्वरूपाचे आहेत किंवा काय, तसेच अशा अभिलेखांची तपासणी लोकहिताला बाधक ठरेल किंवा काय याचा विचार करावयाचा असतो. तसे होण्याची शक्यता आहे असे त्याला वाटत असेल तर त्याने तपासणीसाठी करण्यात आलेला अर्ज फेटाळून लावावा. अशा अभिलेखांचा प्रभारी अधिकारी हा तलाठी असेल तर त्याने तो अर्ज तहसीलदाराकडे पाठवावयाचा असतो. पूर्वी म्हटल्याप्रमाणे अर्ज फेटाळला न गेल्यास, अभिलेख तपासण्यासंबंधीची परवानगी द्यावयाची असते.
6. अभिलेखांच्या तपासणीसंबंधीची फी खाली दिल्याप्रमाणे आहे :-
————————————————————————————————————————————————————————————————–
1. मुंबई शहराशी संबंधित असलेले अभिलेख. प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या एखाद्या भागाकरिता रू.15
2. इतर ठिकाणच्या अभिलेखांकरिता –
अ. नायब तहसीलदाराच्या दर्जाचा किंवा त्यापेक्षा उच्च दर्जाचा प्रभारी अधिकाऱ्याकडील प्रत्येक तासाकरिता किंवा तासाच्या एखाद्या भागाकरिता रू.2
ब. नायब तहसीलदाराच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा प्रभारी अधिकाऱ्याकडील प्रत्येक तासाकरिता किंवा तासाच्या एखाद्या भागाकरिता रू.1
————————————————————————————————————————————————————————————————–
वरील फी आगाउ द्यावयाची असते. तथापी, सरकारी अधिकारी किंवा सरकारी प्रयोजनार्थ याबाबतीत रीतसर प्राधिकृत केलेल्या इतर व्यक्ती किंवा पाल्याधिकरणाचा अथवा एखाद्या स्थानिक प्राधिकरणाचा किंवा सहकारी संस्थांचा अधिकारी यांच्याकडून काहीही फी आकारण्यात येत नाही. अभिलेखांचा प्रभारी अधिकारी निर्देशित करील अशा वेळी, अशा ठिकाणी व अशा अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तपासणी करावयाची असते.
7. तपासणी करण्याची परवानगी देण्यात आलेल्या व्यक्तीने अशा तपासणीच्या वेळी पेन किंवा शाई वापरू नये अथवा तपासणी केलेल्या अभिलेखांवर काही चिन्हे किंवा फेरबदल करू नयेत किंवा त्यातील एखाद्या कागदपत्रातील उतारे लिहून घेउ नयेत. तपासणी झाल्यावर त्याने तपासलेले अभिलेख जसे होते तसेच परत करावेत. तथापि, अशा व्यक्तीला अशा व्यक्तीला अभिलेखाची किंवा त्यातील एखाद्या भागाची पेन्सिलीने नक्कल करून घेता येईल, परंतु अशा रीतीने केलेली नक्कल कोणताही अधिकारी प्रमाणित करार नाही. एखादी व्यक्ती तपासणीच्या वेळी पेन किंवा शाई वापरत असल्याचे किंवा अभिलेखांवर काही चिन्हे अथवा फेरबदल करीत असल्याचे आढळून आल्यास, अभिलेखांचा प्रभारी किंवा अधिकारी निदेश देईल एवढ्या काळापर्यंत अशा व्यक्तीचा तपासणीचा अधिकार काढून घेण्यात येईल. अशा व्यक्तीला तिची बाजू मांडण्याची संधी दिल्यानंतर ती व्यक्ती जिल्हाधिकारी आकारील इतका रू. 200 पेक्षा अधिक नसेल एवढा दंड आकारला जाण्यास पात्र ठरेल.
8. एखाद्या विशिष्ट अभिलेखाच्या तपासणीची परवानगी मिळण्यासाठी किंवा त्याची प्रमाणित प्रत मिळण्यासाठी अर्ज करण्यात येतो व अशा अर्जामध्ये अभिलेखाचा संबंध तपशील दिलेला नसतो किंवा दिलेला तपशील चुकिचा असतो व त्यामुळे पाहिजे असलेल्या अभिलेखाचा शोध घेणे प्रभारी अधिकाऱ्याला आवश्यक ठरते तेव्हा अर्जदाराकडून खाली दिलेल्या दराने शोध फी घेण्यात यावी :-
————————————————————————————————————————————————————————————————–
1. मुंबई शहराशी संबंधित असलेले अभिलेख प्रत्येक दिवसाकरिता किंवा दिवसाच्या एखाद्या भागाकरिता रू.15
2. इतर ठिकाणच्या अभिलेखांकरिता –
अ. अधिनियमाचे कलम 75 अन्वये धारण केल्या जाणाऱ्या जमिनींचे अभिलेख शोध घेतलेल्या प्रत्येक गठ्ठ्याकरिता (रूमालाकरिता) रू.5
ब. इतर कोणताही अभिलेख ज्या वर्षाच्या अभिलेखांचा शोध घेतला असेल त्या प्रत्येक वर्षाकरिता रू.2
————————————————————————————————————————————————————————————————–
ज्यासाठी अर्ज करण्यात आला ती तपासणी किंवा प्रत देण्यात आली आहे किंवा नाही हे लक्षात न घेता उपरोक्त फी आगाउ भरावयाची असते.
9. अभिलेखांचे प्रमाणित उतारे किंवा प्रती अशा अभिलेखांचा प्रभारी असलेल्या अधिकाऱ्याची पूर्वपरवानगी घेउन मिळवता येतील. तथापी राज्य शासनाच्या प्राधिकारानुसार मुद्रित किंवा शिलामुद्रित आणि प्रकाशित केलेल्या व विक्रीसाठी ठेवलेल्या कोणत्याही अभिलेखाची प्रत देण्यात येणार नाही. ज्या व्यक्तीला कोणत्याही अभिेलेखाची प्रत हवी असेल त्या व्यक्तीने अशा अभिलेखांचा प्रघ्भारी अधिकाऱ्याकडे तशा आशयाचा अर्ज करावा आणि त्यामध्ये अभिलेखाचा तपशील आणि प्रती ज्या प्रयोजनार्थ पाहिजे असतील ते नमूद करावे. ज्याच्या प्रती पाहिजे असतील तो अभिलेख गोपनीय स्वरूपाचा असेल किंवा प्रतींचा पुरवठा करणे लोकहिताला बाध आणणारे असेल तर विनंती फेटाळणे भाग पडते. प्रती पुरविण्यासाठी आलेला अर्ज जेव्हा फेटाळावयाचा असतो आणि अशा अभिलेखाचा प्रभारी अधिकारी तलाठी असतो तेव्हा, उक्त तलाठ्याने तो अर्ज आदेशांसाठी तहसीलदाराकडे पाठवावा. पूर्वोक्त प्रमाणे अर्ज फेटाळण्यात येत नसेल तेव्हा, मागणी केलेल्या प्रती फीचा भरणा झाल्यानंतर देण्यात याव्यात. फी आगाउ व रोख देणे आवश्यक असते. प्रती देण्याबद्दल आकारावयाची फीची रक्कम अभिलेखांच्या प्रवर्गानुसार भिन्न असते. याखेरीज, मुंबई शहरातील फीचे दरदेखील राज्याच्या इतर क्षेत्रातील दरांपेक्षा भिन्न आहेत. मुंबई शहराव्यतिरिक्त इतर क्षेत्रातील व मुंबई शहरातील फीचे दर अनुक्रमे, या परिपत्रकाला जोडलेले परिशिष्ट ‘अ’ आणि परिशिष्ट आणि परिशिष्ट ‘ब’ यांमध्ये देण्यात आले आहेत. या दरांमध्ये नक्कल आणि पडताळणी करणे या दोहोंचेही आकार समाविष्ट आहेत.
10. कोणत्याही अभिलेखाच्या प्रमाणित प्रती ज्या अधिकाऱ्याच्या प्रभारात असतील त्या अधिकाऱ्याने, त्याच्याकडे तसा अर्ज केला गेल्यास, विहित फी भरल्यानंतर, अशा प्रमाणित प्रतीची खरी प्रत द्यावी् अशा प्रत्येक खऱ्या प्रतीवर ती अभिलेखाच्या प्रमाणित प्रतीची खरी प्रत आहे असे उक्त अधिकाऱ्याने स्पष्टपणे नमूद करावे.
11. प्रत्येक प्रमाणित प्रतीवर किंवा प्रमाणित प्रतीच्या खऱ्या प्रतीवर, तिच्याबद्दल फी घेणाऱ्या अधिकाऱ्याने पुढील नमुन्यातील पावती पृष्ठांकित करावी.
या प्रमाणित प्रतीची फी म्हणून रूपये ……………………… पैसे …………………..मिळाले.
दिनांक ………………………. (सही) ……………….
12. नक्कल करण्याच्या फीखेरीज अर्जदाराला, राज्य शासन त्याबाबतीत वेळोवेळी विहित करील अशा दराने, नक्कल करण्यासाठी वापरलेले कागद, मुद्रित नमुना, आरेखन कागद, अनुरेखन कागद किंवा कापड यांचा खर्चदेखील भरावा लागतो.
13. अभिलेखाच्या प्रमाणित किंवा खऱ्या प्रतींची तपासणी, शोध किंवा पुरवठा यांसाठी विहित केलेल्या फीखेरीज अर्जदाराला मुंबई मुद्रांक अधिनियम किंवा मुंबई न्यायालये फी अधिनियम याच्या उपबंधानुसार मुद्रांक शुल्क किंवा यथास्थिती, न्यायालय फी देखील भरावी लागते.
