वारसा कायदा कायदेशीर तरतूद
महसूल दफ्तरात कोणत्याही जमिनीच्या मालकी हक्कांत 1.नोंदणीकृत दस्ताने, 2.वारसाने आणि 3. न्यायालयाच्या/सक्षम अधिकार्यााच्या आदेशानेच बदल होतो. इतर अन्य प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाव्दारे जमिनीच्या मालकी हक्कांत कधीही बदल होत नाही.
वारस नोंदीचा अर्ज दाखल केल्यानंतरची प्रक्रिया:
एखादा खातेदार मयत झाल्यानंतर त्याचे वारस, वारस नोंदीसाठी अर्ज करतात. वारस नोंदीसाठी अर्ज प्राप्त झाल्यानंतर गाव कामगार तलाठी त्या अर्जानुसार वारसांकडून जरूर ती पुराव्याची कागदपत्रे घेऊन गाव नमुना नं. 6 क मध्ये (वारस नोंदवही) वारस ठराव नोंदवतात. गावी स्थानिक चौकशी करतात आणि कोणाची हरकत नसल्यास मंडलअधिकारी असा वारस ठराव प्रमाणीत करतात.
वारस ठराव प्रमाणीत केल्यानंतर ती वारस नोंद गाव नमुना नं. 6 (फेरफार नोंद वही) मध्ये नोंदवली जाते. सर्व हितसंबंधीतांना नोटीस बजावली जाते. सर्व हितसंबंधीतांचे जबाब नोंदवले जातात. ‘अर्जात नमूद वारसांव्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नाही’ असे नमूद केलेले स्वयंघोषणापत्र घेतले जाते.
कोणाची हरकत नसल्यास मंडलअधिकारी अशी वारस नोंद प्रमाणीत करतात. त्यानंतर सर्व वारसांची नावे 7/12 सदरी नोंदवली जातात. वारसनोंदीबाबत तक्रारार असल्यास तक्रारकेस चालवली जाते. व त्या तक्रारकेसवर होणार्यात निर्णयानुसार कार्यवाही केली जाते.
वारस नोंदीचा अर्जाबरोबरची कागदपत्रे:
*मयताच्या मृत्युचा दाखला.
*मयताच्या मिळकतीचा चालू वर्षातील (तीन महिन्याच्या आतील) 7/12 चा उतारा
*सदर मिळकत खरेदी केल्याचा फेरफार किंवा मयताचे नाव सदर मिळकतीवर कसे लावले गेले याबाबतचा फेरफार.
*सर्व वारसांची नावे नमूद असणारा अर्ज.
*‘अर्जात नमूद वारसांव्यतिरिक्त अन्य कोणीही वारस नाही’ असे नमूद केलेले स्वयंघोषणापत्र.
*अशा मिळकतीबाबत न्यायालयात काही वाद सुरु असतील, न्यायालयाने जर स्थगिती आदेश किंवा जैसे थे आदेश दिला असेल तर त्याची कागदपत्रांसह माहिती.
*मयताच्या कुटुंबाची शिधा पत्रिका.
*मिळकतीचा खाते उतारा.
महत्वाच्या बाबी:
* बर्या च वेळा असे दिसून येते की, विवाहित मुलींची नावे वारस म्हणून डावलली जातात. विवाहित मुलींबाबत त्यांच्या पालकांचे म्हणणे असते की, ‘मुलीच्या लग्नात आम्ही खर्च केलेला आहे. त्यामुळे आता तिचे नाव वारस म्हणून दाखल करण्याची आवश्यकता नाही.’ ही बाब अयोग्य आहे. मुलीच्या लग्नात खर्च केला म्हणून तिचा वारस हक्क संपुष्टात येत नाही.
* बर्याआच वेळा असे दिसून येते की, मयताच्या वारसांपैकी फक्त पुरुषांची नावेच 7/12 च्या कब्जेदार सदरी नोंदवली जातात आणि महिलांची नावे (पत्नी, विवाहित/अविवाहित मुली इत्यादी) इतर हक्कात नोंदवली जातात. ही पध्दत अत्यंत चुकीची आहे. मयताच्या वारसांपैकी महिलांची नावे सुध्दा कब्जेदार सदरीच नोंदवावी. हिंदू वारसा कायदा 1956 मधील सन 2005 च्या सुधारणेनुसार मुलींनाही, मालमत्तेत मुलाइतकाच हिस्सा मिळण्याचा हक्क प्राप्त झालेला आहे.
* बर्या च वेळा असे निदर्शनास आले आहे की, एखाद्या जमिनीवर एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याचे वारस, वारस नोंदीसाठी अर्ज करतात आणि त्या मयत ए.कु.मॅ. चे वारस म्हणून फक्त त्यांच्याच मुला/मुलींच्या नावाची त्याचे वारस म्हणून नोंद केली जाते. यामुळे मयत इसम ज्यांचा ए.कु.मॅ. असतो त्यांचा वारस हक्क डावलला जातो. वास्तविक एकत्र कुटूंब मॅनेजर म्हणून नाव दाखल असलेला इसम मयत झाल्यानंतर त्याची वारस नोंद करतांना मयत इसमाचे नाव ज्या फेरफार नुसार ए.कु.मॅ. म्हणून दाखल झाले होते त्या फेरफारात नमूद सर्व व्यक्तींना नोटीस बजावणे आवश्यक असते. त्यापैकी जे सज्ञान झाले आहेत त्यांची नावे तसेच इतर व्यक्तींपैकी जे मयत आहेत त्यांच्या वारसांची आणि ए.कु.मॅ. चे वारस अशा सर्वांची नावे वारस ठराव करून आणि त्यानंतर गाव नमुना नं. 6 मध्ये कब्जेदार सदरी आणणे आवश्यक असते.
मुस्लिम कायद्यामध्ये एकत्र कुटूंब मॅनेजरची संकल्पना नाही हे लक्षात ठेवावे.
* हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये वारस नोंद करतांना प्रथम वर्ग 1 च्या वारसांची चौकशी करून त्यांची वारस म्हणून नोंद करावी लागते. वर्ग 1 चे वारस उपलब्ध नसतील तर वर्ग 2, त्यानंतर वर्ग 3, वर्ग 4 प्रमाणे चौकशी करून त्यांची वारस म्हणून नोंद करावी लागते.
वर्ग 1 चे वारस: (1)मुलगा, (2) मुलगी, (3)पत्नी, (4)आई, (5)मृत मुलाचा मुलगा/मुलगी,
(6)मृत मुलीचा मुलगा/मुलगी, (7) मृत मुलाची विधवा, (8) मृत नातवाचा मुलगा/मुलगी,
(9)विधवा नात सून असे असतात.
* वारस नोंद, मयत खातेदारास लागू असलेल्या वारसा कायद्याप्रमाणे करावी लागते. मयत हिंदू, बौध्द, जैन, शिख असल्यास हिंदू वारसा कायदा 1956, मयत मुसलमान असल्यास मुस्लिम वारसा कायदा, मयत पारशी, ख्रिश्चान असल्यास भारतीय वारस अधिनियम, 1925 अन्वये सदर चौकशी करावी लागते.
* जर मयत खातेदारास कोणीही वारस नाही असे आढळून आल्यास महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966, कलम 34 अन्वये कारवाई करता येते.
* हिंदू स्त्री विना मृत्यूपत्र मरण पावली तर तिच्या संपत्तीस अनुक्रमे (वर्ग-1) तिचा पूर्व मृत मुलगा किंवा त्याची आपत्ये यांसह मृत स्त्रीची मुले/मुली आणि मृत स्त्रीचा पती, (वर्ग-2) पतीचे वारस, (वर्ग-3) मृत स्त्रीचे माता व पिता (वर्ग-4) मृत स्त्रीच्या पित्याचे वारस, (वर्ग-5) मृत स्त्रिच्या मातेचे वारस, असे वारस असतात.
* ज्या हिंदू स्त्रिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने संपत्ती मिळालेली असते, अशी स्त्री मयत झाल्यास, तिची संपत्ती त्या मृत स्त्रीचा पूर्व मृत मुलगा/मुलगी किंवा त्याची अपत्ये यांसह मृत स्त्रीच्या मुले/मुली यांच्याकडे जाते. मृत स्त्री विना आपत्य मरण पावल्यास तिला तिच्या पिता/मातेकडून वारसाने मिळालेली संपत्ती तिच्या पित्याच्या वारसांकडे प्रक्रांत होते.
* कायदेशीररित्या खरेदी दस्त केल्यानंतर जर एखादी व्यक्ती मयत झाली तरीही त्या व्यक्तीला कायदेशीरपणे प्राप्त झालेल्या हक्कांना बाधा येत नाही. अशा व्यवहाराची नोंद, मयताच्या वारसांच्या नावे प्रमाणीत करता येते.
