भूसंपादन संयुक्त मोजणी
कार्यालयात भूसंपादनाचे प्रकरण प्राप्त झाल्यावर खालील कागदपत्रे त्यासोबत प्राप्त झाली आहेत काय? याबाबत शहनिशा करण्यात येते.
जमीन मोजणीसाठी लागणारी कागदपत्रे
१. विहित नमुन्यातील अर्ज फी कोर्ट फी स्टँप सह.
२. गाव नमुना ७/१२ चा उतारा किंवा आखीव पत्रिकेचा उतारा.
३. मोजणी फी भरण्या बाबतचे चलन.
४. मोजणी करावयाच्या जमिनीचा अंदाजे नकाशा ,अगर जमिनीच्या कोणत्या बाजू बाबत हद्दीची तक्रार व कोणत्या बाजूची हद्द काय करून पाहिजे याचा तपशील.
५ . लगत खातेदारांचे नाव व पत्ता.
१. भूसंपादन मोजणीचे कामकाज :-
जिल्हाधिकारी यांचेकडुन प्रकरणांची सर्व पूर्तता झालेची खात्री झालेनंतर सदरचे प्रकरण मोजणीसाठी भूमी अभिलेख विभागाकडे प्राप्त होते. सदर प्रस्तावासोबतच्यात कागदपत्रांची पडताळणी केल्या नंतर सदरचे प्रकरण भूसंपादन मोजणी रजिष्टर नोंदवहीत नोंदविणेत येते. तदनंतर कार्यालय प्रमुख हे सदरचे प्रकरण मोजणीसाठी भूकरमापक यांचेकडे वर्ग करतात. भूकरमापक हे मोजणीकामी आवश्यक असणारे सर्व अभिलेख, अभिलेख कक्षातून काढून घेतात. त्यानंतर भूकरमापक हे संबंधित संपादन मंडळ, संबंधित भूसंपादन अधिकारी, तलाठी, ज्याच्या जमिनी संपादन होणार आहेत त्यांना आगाऊ नोटीशीने कळवुन, मोजणी तारखेला भूसंपादन मंडळाकडील रेखाकिंत नकाशा आधारे व सीमांकना आधारे मोजणी करतात. सदर मोजणी नकाशावर संपादन मंडळाच्या हजर असणा-या अधिकारी व संबंधित भूधारक यांच्या स्वाक्षरी घेऊन कामाची पुर्तता करतात. सदर संयुक्त मोजणी नकाशाच्या व संयुक्त विवरण पत्राच्या पाच (अ,ब,क,ड,ई) प्रति तयार करतात. जागेवर आढळून आलेल्या विहीरी, इमारती, मोठी झाडे, टेलिफोन खांब, विज खांब, फळझाडे, इत्यादींच्याा नोंदी मोजणी आलेखात व संयुक्त मोजणी विवरण पत्रात घेण्यात येतात. सदर मोजणीचे काम पुर्ण झालेनंतर संयुक्त विवरण पत्राच्या व मोजणी आलेखाच्या तीन प्रती (क,ड,ई) सविस्तर अहवालासह भूसंपादन अधिकारी यांचेकडे पाठवितात. भूसंपादन मोजणीमध्ये तयार केलेला अभिलेख हा कायम स्वरुपी जतन केला जातो. भूसंपादनाच्या मंजूर निवाडयानंतर तो नक्कल देणेस पात्र ठरतो.
शेत जमीनीच्या मोजणीचा अर्ज हा आता प्रत्येक तालुक्याला जे मोजणी कार्यालय आहे, त्या तालुका निरिक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडे करावा लागतो. या अर्जामध्ये, अर्ज करणार्यात व्यक्तिचे नांव, पत्ता, मोजावयाच्या जमीनीचे वर्णन चतु:सिमा, खातेदाराचे नांव व पत्ते इत्यादी महत्वाचा तपशिल असतो. कोणत्याही खातेदाराने मोजणीबाबतचा अर्ज दाखल केल्यानंतर अशा मोजणी प्रकरणाला मोजणी रजिस्टर नंबर (मो. र. नंबर) दिला जातो. त्यानंतर सदर प्रकरणामधील जमीनीबद्दलचे जे मूळ रेकॉर्ड कार्यालयात आहे त्या मूळ रेकॉर्डमधून टिपण / फाळणी व एकत्रीकरण झाले असल्यास त्या योजनेचा उतारा तयार करुन या प्रकरणामध्ये लावला जातो व हे संपूर्ण प्रकरण मोजणी करणार्यास भूकर मापकाकडे (सर्व्हेअर) दिले जाते. मोजणीसाठी प्राप्त झालेल्या अशा प्रकरणामध्ये संबंधित भूकर मापक हा अर्ज करणार्याद व्यक्तींना व पत्ते देण्यात आलेल्या लगतच्या कब्जेदारांना मोजणीच्या अगोदर किमान १५ दिवस आधी रजिस्टर पोष्टाने नोटीस पाठवून तारीख कळवतो. सर्वसाधारणपणे जून ते ऑक्टोबर या पावसाळी मोसमात तालुक्यामध्ये रेकॉर्डबद्दलचे काम केले जाते. उर्वरित काळात जमीनीच्या मोजणीचे काम सर्व्हेअरमार्फत केले जाते. प्रत्यक्ष मोजणीच्या दिवशी, मोजणी करण्यासाठी भूकर मापकास मदतीसाठी लागणारे मजूर, निशाणदार, चुना, हद्दीचे दगड इत्यादी साहित्य हे अर्जदाराने स्वत:च्या खर्चाने पुरविणे अपेक्षित आहे. आजकालच्या सर्व मोजणी या प्लेन टेबल मोजणी पध्दतीने केल्या जातात. प्रत्यक्ष जमीनीची लांबी, रुंदी किंवा बांधाचे माप न घेता प्लेन टेबल पध्दतीने मोजणीदाराला मोजणी नकाशा हा तंतोतंत वस्तुस्थितीप्रमाणे तयार करता येतो. जमीन वर, खाली, ओबडधोबड व ओढया-नाल्याची असली तरी तिचे निश्चित असे आकारमान हे या प्लेन टेबल पध्दतीने समजू शकते. मोजणीसाठी आलेले सर्व्हेअर हे सर्वप्रथम जी जमीन मोजावयाची आहे त्या जमीनीची पाहणी करुन प्रत्यक्ष वहिवाट कोठे आहे याबाबत अर्जदार शेतकर्याथस विचारणा करतात. प्रत्यक्ष वहिवाटीप्रमाणे हद्द लक्षात यावी म्हणून खुणा ठेवल्या जातात. त्याचप्रमाणे जमीनीमध्ये किंवा त्या गटाजवळ असलेल्या मुळ मोजणीच्या खुणा म्हणजे सर्व्हे नंबरचा दगड किंवा बांधाचा दगड किंवा उरळया यांच्या खुणा विचारात घेऊन प्लेन टेबलच्या आधारे जमीनीची मोजणी केली जाते. मोजणीच्या वेळी अनेकवेळा जो शेतकरी अर्ज करतो त्याच्या लगतचे शेतकरी मात्र गैरहजर राहतात. विशेषत: जर अतिक्रमणाचा प्रश्न निर्माण झाला असेल तर अतिक्रमण करणारी व्यक्ती हजर रहात नाही. एखादी व्यक्ती मोजणीच्या वेळी गैरहजर राहिले तरी त्यांच्या गैरहजेरीमध्ये मोजणी करता येते. तथापि मोजणी करण्यांत येणार आहे अशाप्रकारची आगाऊ नोटीस संबंधीत व्यक्तिला बजावली गेली असली पाहिजे किंवा त्या व्यक्तिनी ही नाटीस घ्यावयास नकार दिला असला पाहिजे. मोजणीच्या आधारे प्लेन टेबल वर आपोआप जमीनीच्या खूणा व नकाशा तयार होत जातो. मोजणीच्या संदर्भात अर्जदारासह सर्व संबंधिंतांचा लेखी जबाबसुध्दा सर्व्हेअरकडून घेतला जातो. एखाद्या व्यक्तीने जबाब न दिल्यास, त्याने जबाब द्यावयास नकार दिला असा पंचनामा करतात. प्लेन टेबलच्या आधारे होणारी ही मोजणी नेहमीच जमीनीच्या मूळ रेकॉर्डशी तुलना करुन पाहिली जाते. त्यामुळे कधीकधी जमीनीची मोजणी झाली की लगेचच हद्दीच्या खुणा न दाखवता पुन्हा तालुक्यामध्ये जाऊन मूळ रेकॉर्डशी तुलना करुन क्षेत्राचा मेळ बसल्यानंतर काही दिवसांनंतर जमीनीच्या हद्दी दाखविल्या जातात.
२. मोजणीनंतरची कार्यवाही :-
अशा पध्दतीने जमीनीची मोजणी करुन प्रत्यक्ष हद्दी पुन्हा दाखविल्यानंतर तालुका कार्यालयात मोजणी नकाशाच्या स्वच्छ दोन प्रती तयार केल्या जातात. अशा मोजणी नकाशामध्ये मोजणी कोणी मागितली आहे त्या अर्जदाराचे नांव, मोजणीची तारीख, सर्व्हेअरचे नांव, नकाशाच्या दिशा, हद्दी दाखविल्याचा दिनांक, नकाशाचे स्केल व सहीशिक्का इत्यादी महत्वाचा तपशिल लिहिलेला असतो.
जर वहिवाटीची हद्द आणि रेषेप्रमाणे येणारी हद्द वेगवेगळया असतील तर अशी वहिवाटीची हद्द तुटकतुटक रेषेने व रेकॉर्डप्रमाणे येणारी हद्द ही सलग रेषेने दाखविली जाते. या दोन्हीमध्ये अतिक्रमणाचे क्षेत्र रंगाने रंगवून दाखविले जाते. मोजणी नकाशावर सुध्दा – – – ही वहिवाटीची हद्द असून ______ ही रेकॉर्डची हद्द आहे. रंगाने दाखविलेले क्षेत्र हे कोणत्याु गट नंबरमधील आहे व कोणत्याट गट नंबराच्या मालकाने अतिक्रमण केले आहे याचा उल्लेख असतो. अशा पध्दतीने मोजणीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अर्जदाराचा अर्ज निकाली काढून त्यास मोजणी नकाशाची एक प्रत दिली जाते.
* मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख यांचेकडील परिपत्रक क्रमांक एल. आर. / ११५३/सी. आर. ३५०३/ ल ३ / ९३ दिनांक १६/०४/१९९३ मध्ये दिलेल्या सूचनेप्रमाणे हद्द कायम मोजणी प्रकरणी कार्यवाही करावयाची आहे.
कार्यालयात प्रकरण जमा केल्यानंतर ते तालुका निरीक्षक भूमी अभिलेख यांचे स्वाक्षरीने छाननी लिपिकाकडे छाननीसाठी सुपूर्द केले जाते. छाननी लिपिकाने छाननी करताना खालील बाबी पाहणे आवश्यक आहे.
१. भूकर मापकाने मोजणी कामी अर्जदार / लगत कब्जेदार यांना मोजणी तारीख नेमलेबाबत आगाऊ / मुदतीच्या नोटीस काढल्या आहेत काय?
२. त्याबाबतचा पोस्टचा दाखल प्रकरणी सामील केला आहे काय ?
३. मोजणी आलेखावर टिपण व फाळणी भूमापनचे मूळ अभिलेखाप्रमाणे अचूकीत बसविली आहे काय? व त्यानुसार अर्जदार लगत कब्जेदार यांना नवीन हद्दीच्या खुणा दाखविल्या आहेत काय?
४. मोजणी आलेख मुद्या क्रमांक १ च्या अनुषंगाने रंगविलेल्या आहे काय? तसेच त्यावर आवश्यक त्या खुलासा टिपा नमूद केल्या आहेत काय? खुलासा टिपा व मोजणी आलेखात रंगविलेला भाग एकमेकांशी मिळत आहे काय?
५. मोजणीच्या वेळी आढळून आलेल्या कायमच्या खुणा व अर्जदार लगत कब्जेदार यांना दाखविलेल्या हद्दीच्या खुणा ह्या मोजणी आलेखावर सांकेतिक खुणांनी दाखविल्या आहेत काय?
६. अर्जदार यांच्या मोजणी केलेल्या जमिनीमध्ये आलेखावर असे तांबड्या शाईने लिहले आहे काय?
७. हद्दीच्या खुणा पाहिल्याबाबत अर्जदार लगत कब्जेदार यांचे जबाब घेतले आहेत काय?
८. मोजणी आलेखावर लागू अट / सर्व्हे नंबरचा तपशील नमूद केला आहे काय?
९. मोजणी आलेखावर अतितातडी /तातडी / साधी मोजणीच्या अनुषंगाने प्रकारावर मोजणी रजिस्टर नंबर लिहिला आहे काय?
१०. प्रकरणात टिपण, फाळणी व एकत्रीकरण योजनेची करणापुरती नक्कल इ. नकला त्यावर जरूर ते मथळे लिहून तयार करणार, तपासणार यांच्या स्वाक्षऱ्या हुद्दे नमूद केले आहेत काय?
भूकर मापकाने मोजणी आलेखावर कायम हद्दीच्या खुणांच्या संदर्भात टिपण व फाळणी / माजी अचूकरीत्या न बसविता हद्दीच्या खुणा अर्जदार व लगत कब्जेदार यांना जागेवर दाखवून तसा आलेख रंगविला असेल तर छाननी लिपिकाने त्यावर पेन्सिलने टिपण व फाळणी
अचूकरीत्या बसवून नवीन हद्दीच्या खुणा कोणत्या येतात ते मोजणी आलेखावर अद्याक्षराने नमूद केल्यानुसार अर्जदार / लगत कब्जेदार यांना या प्रमाणात हद्दी खुणा दाखवाव्यात.
